श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान हे नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव येथे वसलेले प्रसिद्ध असे ठिकाण आहे. हे खंडोबाचे पुरातनकालीन मंदिर आहे.
सदर देवस्थान खंडोबा माळेगाव यात्रा म्हणून प्रसिद्धिस आहे. सदरचे देवस्थान हे हेमाडपंथी असून ते १ हजार वर्षांपूर्वीचे आहे. तेथील लोकसंख्या २५०० आहे.सदर देवस्थानचा उत्सव मार्गशीर्ष अमावास्येच्या अगोदर २ दिवस व नंतर ३ दिवस असा ५ दिवस चालतो. त्यावेळेस देवस्थानचा छबिना निघतो.
दक्षिण भारतातील सर्वात मोठी ग्रामीण यात्रा येथे भरते. ही यात्रा साधारणत: १५० वर्षापुर्वीपासून भारत आहे.
सदरील यात्रा जरी ५ दिवसांची भरत असली तरी जनावरांचा बाजार जवळपास एक माहिनाभर चालतो. यामध्ये घोडे, गाढव, उंट, देवणी, तसेच लालकंधारी वळू, गाई, तसेच कुत्रे, कोंबडे यांचाही यामध्ये समावेश आहे. जनावरांचा बाजार हा म्हणजे माळेगाव यात्रेच्या अर्थव्यवस्थेचा कणाच होय. माळेगाव यात्रेत पाच हजारांपासून बारा लाख रुपयांपर्यंत किमतीची अश्व् येत असतात.
या जत्रेत संसारोपयोगी वस्तू, मुलांसाठी खेळणी, खाऊ, मिठाई, शेतीची अवजारे, वेगवेगळ्या व्यवसायांसाठी लागणारी हत्यारे, कपडे, भांडी, जनावरांसाठी लागणाऱ्या साखळ्या, घुंगरू, झुल, खोगीर, पट्टे, कासरे, चाबूकगोंडे, महिलांना प्रसाधनासाठी लागणारे साहित्य, दागदागिने, सतरंज्या, लोकरीचे कपडे, स्वेटर, खोबरे, भंडारा, नारळ, बत्तासे, पेढे, मुरमुरे, रेवड्या इत्यादी सामुग्रीचे दुकाने थाटलेली आहेत. तुळजापूर, पंढरपूर, जेजुरीहून आणलेल्या देवी-देवतांच्या मूर्ती, फोटो, कोसल्याचा पटका, शेला-पागोटे, चादर, कपडे याबरोबरच जुन्या कपड्यांची बाजारपेठ या ठिकाणी भरते.