उदगीरच्या लढाईपूर्वी पेशव्यांनी माळेगावच्या यात्रेतून दोन हजार घोडे खरेदी केले होते, असे म्हणतात. मा. मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांची माधुरी घोडी ही तर यात्रेची खास आकर्षण. माधुरी म्हणजे विलासरावांचे वडील दादासाहेबांचा जीव की प्राण. त्यांनी माळेगाव यात्रेत १ लाख ७० हजार रुपये किमतीची लाल घोडी व रोख १ लाख ३० हजार रुपये देऊन आग्रा येथून आलेली माधुरी खरेदी केली.
घोड्यांच्या वैशिष्ट्यात अबलख, सब्जा, सफेत मुस्की, काली मुस्की व काठेवाडी घोड्यांना मोठी मागणी आहे. पांढरा शुब्र्ह रंगाचा, एटदार मान, डौलदार बांधा, चपळपणा. ईशारे समजणे इ. वैशिष्टे असणाऱ्या घोड्यांची किंमत अधिक असते. घोडे खरेदी करणारी माणसं त्या घोड्याची बरकाइने पाहणी करतात. तो पाय कसा टाकतो, त्याला दात किती, तो नृत्य करतो का अशा बारीकसारीक बाबींची कसून चौकशी करून ते तासन तास त्याचे निरीक्षण करतात व त्याची किंमत ठरवतात. एकेक घोड्याच्या दहा-वीस लांखापर्यंत किमती असतात. मोठमोठ्या किंमती घोड्यांची खरेदी करण्याची चढाओढ लागते. लग्न समारंभात व मिरवणुकीनसाठी कमी किंमतीचे काठेवाडी घोडे घेतले जातात. काठेवाडी घोड्यांसाठी उदगीर, सारंगखेडा, लोहा, कंधार इ. ठिकाणांहून व्यापारी येत असतात.
घोड्यांच्या बाजाराबरोबर गाढवांचाही बाजार या ठिकाणी भरत असतो. जेजुरी, उदगीरप्रमाणेच याही ठिकाणी हजारो गाढवांची खरेदी-विक्री होत असते. कारवान, काठेवाडी गाढवांना येथे चांगली मागणी असते. वैदू समाजातील माणसे दुरदुरच्या प्रांतातून लांबचा प्रवास करून या ठिकाणी विक्रीसाठी गाढवं आणत असतात. या यात्रेत वीस-वीस हजारापर्यंत गाढवं विकली गेल्याचे लोकं सांगतात.
वैदू, घिसाडी, वडार समाजाला गाढवांची नितांत गरज भासते. त्यांचे जीवन भटकंतीचे असते. एकाठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बिऱ्हाड वाहून नेण्यासाठी गाढवांची गरज असते.
कुत्रा खंडोबाचा आवडता आहे. कुत्र्याला दूरवरून चोरांचा सुगावा लागतो. शहरातील श्रीमंत मंडळीसुद्धा आपल्या घराच्या, बंगल्याच्या रखवालीकारिता कुत्रे पाळत असतात. माळेगाव यात्रेत कुत्र्याचे प्रदर्शन भरवले जाते. या प्रदर्शनात निरनिरळ्या जातींची, रंगाची वेगवेगळी ठेवण असलेली विविध कुत्री पहावयास मिळतात.
एखाद्या चोरी, दरोड्याप्रसंगी गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी या कुत्र्यांचाच उपयोग होतो. तसेच दडवलेल्या स्फोटकांचे साठे शोधण्याचे कामही हि कुत्री करीत असतात.
येथे उंटांचाही बाजार भरत असतो. परप्रांतातील राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश इ. ठिकाणहून व्यापारी मंडळी यात्रेकारीता उंट घेऊन येत असतात. हे सर्व बघून राजस्थानातील पुष्कर मेळ्याची आठवण येते.
येथे जिल्हापरिषदेतर्फे भव्य पशुप्रदर्शनाचे आयोजन केले जाते. जातिवंत जनावरांची निर्मिती, गाई, बैल व म्हशींच्या वंशावळीचे रेकॉर्ड ठेवणे व त्याद्वारे उत्तम प्रतीच्या जनावरांचे जतन व संवर्धन करणे, जनावरांच्या पोषक आहाराबद्दल माहिती व जनजागृती करणे, जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व संसर्गजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी माहिती करून देणे इ. उद्देशांकारिता पशुप्रदर्षने भरवली जातात.
देवणी, लालकंधारी, जर्सी, होलस्टीन फ्रिजीयन इ. जातीच्या गाई-वासरे कालवडीचा प्रदर्शनात सहभाग असतो. प्रत्येक जातितून एक सर्वोकृष्ट जनावर निवडले जाते. त्या जनावराच्या मालकास चांदीचे कडे व रोख बक्षीस दिले जाते.