• माळेगाव, ता. लोहा, जिल्हा. नांदेड.
  • +९१ ८६ ९८४८ ७६१८
  • skyastech@gmail.com

कथा

माळेगाव खंडोबा कथा

एकदा बिदरचा एक व्यापारी रात्र झाली म्हणून गाढवाच्या पाठीवरील तांदळाच्या गोण्या उतरवून मालावर मुक्कामास थांबला. सकाळी पुढील प्रवासाला जाण्याकरिता गोण्या उचलून गाढवाच्या पाठीवर ठेवत असताना एक गोणी काही केल्या उचलता आली नाही. यावेळेस त्यास रात्री झोपेत स्वप्न आठवले. खंडोबा त्याला स्वप्नात म्हणाले होते की, रीसन गावातील भक्ताच्या हस्ते माझी प्रतिष्ठापना कर. असेच स्वप्न रीसन गावातील नागोजी नाईकांनाही पडले होते. बिदरच्या व्यापारयाच्या विनंतीनुसार नाईकांनी येऊन तांदळाची गोनी उघडून पाहिली असता त्यात तांदळे सापडले. खंडोबाचे प्रतिक स्वरूप म्हणून व्यापाऱ्याने तांदळ्याची त्या ठिकाणी प्रतिष्ठापना केली. कालांतराने त्या ठिकाणी मंदिर उभारले गेले.

माळेगावपासून १५-२० की.मी. अंतरावर असलेल्या रीसन गावच्या याच नागोजी नाईकांच्या कुटुंबियांकडे मळेगावच्या पालखीचा मान आहे. तसेच कंधारजवळ असलेल्या भोसी गावातील वाणी कुटुंबाकडे खंडोबाच्या पागोटयाचा मान आहे. चंपाष्टीच्या दिवशी भोसीकर आपले पागोटे घेऊन माळेगावला येतात व ते पागोटे मार्गशीष अमावस्येच्या यात्रेपर्यंत खंडोबाच्या मंदिरात ठेवतात. पालखीच्या कार्यक्रमातही हे पागोटे खंडोबाच्या पुढे ठेवलेले असते. आजही भोसीकर मानकरी चंपाष्टीपासून अमावस्येपर्यंत पागोटे वापरात नाहीत.

मल्हारी कथा

कृतयुगात माणिचूल पर्वतावर सप्तर्षी तप करत असताना मणी व मल्ल या दोन दैत्यांनी त्यांच्यावर हल्ला करून तपोवन उद्ध्वस्त केले. या अत्याचाराने त्रस्त झाल्याने ऋषी इंद्राकडे दाद मागण्यासाठी गेले. ब्रह्मदेवाच्या वरप्रसादाने अजिंक्य झालेल्या त्या दोघा दैत्यांचा वध करण्यास इंद्राने असमर्थता दर्शविली. यानंतर सर्व ऋषी विष्णूकडे गेले. तेथेही त्यांच्या संकटाचे निवारण न झाल्याने सर्वजण शिवशंकराकडे गेले. ऋषींच्या तोंडून मणी मल्लांच्या कथा ऐकून भगवान शंकर संतप्त झाले व या दैत्यांच्या विनाशाकरिता मार्तंड भैरवाचे रूप घेतले.

कार्तिकेयाच्या नेतृत्वाखाली सात कोटी (यळकोट) गणांचे सैन्य एकत्र करून मानिचुल पर्वतावर आक्रमण केले. मार्तंड भैरवाच्या सैन्याचे व मणी मल्लांचे तुंबळ युद्ध सुरु झाले. मार्तंड भैरवाने मणीचे वक्षस्तळ विदीर्ण करून त्याला जमिनीवर पाडले. एवढ्यात त्याच्या पायाला स्पर्श करून मणी दैत्यानी त्याची स्तुती केली व वर मागितला. “प्रभो, माझे शीर तुझ्या पायाखाली नित्य असू दे. माझे अस्वारूढ रूपही तुझ्या सानिध्यात राहू दे ”.

मार्तंड भैरवाने ततास्थू म्हटले व त्याच्या मस्तकी पाय ठेवला. पुढे जेंव्हा मल्ल दैत्याला त्याने खाली पाडले, तेंव्हा मरण्यापूर्वी तोही मार्तंडभैरवाला म्हणाला, “देवा, माझे नांव तुझ्या आधी असावे. लोकांनी तुला मल्हारी (मल्ल + अरी) असे संबोधावे”. मार्तंड भैरवाने त्यालाही तथास्तू म्हटले.

नंतर भयमुक्त झालेल्या सप्तर्षीनी मार्तंडभैरवाला स्वयंभू लिंगरूपाने प्रेमपूर (पेम्बर) येथे राहण्याबद्दल विनंती केली व मार्तंडभैरवाने ती मानली. खंडोबाच्या पत्नीचे नांव म्हाळसा असल्याने खंडोबाला म्हाळसाकांत असेही म्हणतात. म्हाळसेला मोहिनीचा अवतार असेही समजतात. खंडोबाच्या दुसऱ्या पत्नीचे नांव बाणाई. बाणाई धनगराची मुलगी होती. खंडोबाच्या परिवारात कुत्र्याला स्थान आहे. कुत्रा हा भैरवाचा आवडता प्राणी आहे. यांच्या चार अयुधापैकी खड्गाचे विशेष महत्व आहे. खड्गाचे टपकणारे रक्त कुत्रा चाटत असतो. या खड्गाला खांडा म्हणतात. खांडा ज्याचे हाती तो खंडोबा, असे नांव रूढ झाले.

वाघ्या आणि मुरळी हे खंडोबाचे सेवेकरी होत. खंडोबाच्या उपासनेत कुत्र्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. कुत्र्याइतकीच अनन्य भक्ती वाघेहीक करतात. मुरळी म्हणजे खंडोबाच्या उपासनेतील देवदासी होत. वाघे व मुरळी सर्व दक्षिण महाराष्ट्रभर फिरतात व भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात. खंडोबाच्या उपासनेत भंडाऱ्याला (हळदीला) फार महत्व आहे. खंडोबाच्या जत्रेत भंडारा उधळतात व वाघ्ये लोक भक्तांच्या कपाळी भंडारा लावून दक्षिणा मागतात.

पूर्वी बगाड घेण्याची प्रथा होती. यामध्ये भक्त स्वतःच्या मानेत किंवा कमरेला लोखंडी हूक अडकवून उंच खांबावर स्वतःला टांगून असत. याप्रसंगी होणाऱ्या जखमांना भंडारा लावला जात असे व भंडाऱ्यानेच त्या बऱ्या होतात, असा भक्तांचा दृढविश्वास असे.

cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry|wholesale jerseys